
Rabi Crop : मागील वर्षापेक्षा यंदा गव्हाचा पेरा वाढला आहे, इतकंच नाही, तर रबीत भाताचा पेराही वाढला असून तेलबियांची लागवड मात्र घसरली आहे. त्यामुळे आगामी काळात तेलबियांचा बाजार काहीसा गरम राहण्याची शक्यता असून डाळी आणि धान्याच्या किंमती मात्र स्थिर राहतील अशी चिन्हे आहेत.
दिनांक ३ जानेवारी २५ रोजी पर्यंत केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुरविलेल्या रब्बी पेऱ्याच्या माहितीनुसार यंदा देशभरात रब्बी पिकांचा पेरा ६२२ लाख ७६ हजार हेक्टर झाला असून मागील वर्षी याच काळात हा पेरा ६२१ लाख २२ हजार इतका होता. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा गव्हाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. देशभरात रब्बी हंगामात सरासरी ३१२ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड होते. मागील वर्षी सरासरीपेक्षा थोडी जास्त म्हणजेच ३१४.२५ लाख हेक्टर लागवड झाली होती. यंदा त्या वाढ होऊन सरासरीपेक्षा तब्बल ५ लाख ४९ हजार हेक्टरने गहू लागवड वाढली आहे.
यंदा ३१९ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी झाली आहे. हवामान ठिक राहिले, तर यंदा गव्हाचे उत्पादन काहीसे वाढणार असून दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
भाताच्या लागवडीत किरकोळ वाढ झाली आहे. केवळ १६ हजार हेक्टरने भाताचे क्षेत्र वाढले आहे. मात्र सरासरी ४२ लाख २ हजार हेक्टरच्या तुलनेत एकूण लागवड कमी आहे. यंदा भाताची लागवड १६.९३ लाख हेक्टर झाली आहे. मागच्या वर्षी हीच लागवड १६.७७ लाख हेक्टर इतकी होती.
हरभरा क्षेत्रात यंदा १.२८ लाख हेक्टरने वाढ झालेली दिसत असली, तरी सरासरी १००.९९ लाख हेक्टरच्या तुलनेत हरभरा क्षेत्र कमीच आहे. यंदा ९४. ४५ लाख हेक्टर हरभरा लागवड झाली आहे. मागच्या वर्षी ९३.१७ लाख हेक्टर लागवड होती.
तेलबियांच्या लागवड क्षेत्रात यंदा सुमारे ५ लाख हेक्टरने घट झाली आहे. यंदा सूर्यफूल आणि भुईमुगाचा पेरा अनुक्रमे ३७ हजार आणि २३ हजार हेक्टरने वाढला असला, तरी मोहरीचा पेरा घटला आहे. एकूण तेलबियांखालील क्षेत्र यंदा ९६.९४ लाख हेक्टर असून मागच्या वर्षी ते १०१.६४ टक्के इतके होते.