
kanda bajarbhav : आज दिनांक १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीमुळे राज्यातील प्रमुख कांदा बाजारात लिलावांना सुटी आहे. सोलापूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू असल्याने चार दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत तेथील बाजार बंद असणार आहे. लासलगाव, येवला, मनमाड अशा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारसमित्या संक्रांतीच्या सुटीमुळे बंद आहेत. तर मनमाड येथे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपळगाव बसवंत, सांगली, मोशी अशा काही बाजारात आज कांदा आवक झाल्याचे दिसून आले. दरम्यान मजूरांनाही सुटी असल्याने आज उद्या कांदा काढणी आणि आवक कमीच राहण्याची शक्यता असून गुरूवारनंतर कांदा आवक वाढू शकते.
पिंपळगावला वधारला बाजार
दरम्यान मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याच्या सरासरी बाजारभावात घसरण झाली असली, तरी लासलगाव, पिंपळगावमध्ये कांदा दर सोमवारी टिकून राहिले. आज दिनांक १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याची सकाळच्या सत्रात सुमारे साडे १४ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये, जास्तीत जास्त २६५१ आणि सरासरी १९५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. कालच्या तुलनेत पिंपळगाव बसवत येथील बाजारभाव आज दीड रुपयांनी सरासरी वधारल्याचे दिसून आले.
पुणे येथे आज सकाळी ५ हजार ३०० क्विंटल कांदा आवक झाली. सरासरी बाजारभाव २०५० रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. कालच्या तुलनेत येथील बाजार स्थिर आहेत. मोशी बाजारात सरासरी १२५० बाजारभाव मिळाले असून कालच्या तुलनेत त्यात तब्बल ४०० रुपयांची घसरण आहे. सांगली बाजारात आज सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात बरीच घसरण दिसून आली.