
Grape farming : या आठवड्यातील हवामानानुसार द्राक्षबागेची काळजी कशी घ्यायची याची शिफरस महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी मोसम विभागाच्या तज्ज्ञांनी केली आहे.
भुरी रोगाचे नियंत्रण:
कमी तापमानामध्ये प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसेल.
बऱ्याच ठिकाणी पानाच्या मागे दडलेला द्राक्षघड पूर्णपणे भुरी रोगाने ग्रस्त झालेला दिसून येईल. या वेळी द्राक्षबागेत ५० दिवसांनंतर वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करण्याची शिफारस नाही. यावर उपाययोजना म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करता येईल. मोकळी कॅनॉपी असलेल्या बागेत ही समस्या कमी प्रमाणात दिसून येते.
कारण या कॅनॉपीमध्ये हवा सतत खेळती राहिल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे फवारणीचे कव्हरेज चांगले होऊन प्रभावी रोग नियंत्रण होते. म्हणजेच या कॅनॉपीमध्ये रोगास पोषक वातावरण तयार होत नाही. या वेळी जैविक नियंत्रणावर जोर देता येईल.
धुके साचल्यास काय करावे?
धुके, पानांवर दवबिंदू जास्त काळ टिकून राहिल्यास पाने जास्त काळ ओली राहतात. त्यामुळे आर्द्रतासुद्धा वाढते. या काळात डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बीजाणू सक्रिय होतात.पाणी उतरत असलेल्या परिस्थितीत सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून येईल.
अशा वातावरणात भुरी आणि डाऊनी या दोन्ही रोगांचे नियंत्रण गरजेचे असेल. ज्या बागेत पाने जास्त वेळ ओली राहतात, तेथे स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करणे फायद्याचे असेल.यामुळे ओल्या पानांवर जास्त वेळ बुरशीनाशक चिकटून राहील व रोग नियंत्रण सोपे होईल, कॅनॉपीत वाढलेल्या आर्द्रतेत पाने जास्त काळ ओली नसलेल्या परिस्थितीत जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माच्या तीन-चार फवारण्या करून घेतल्यास प्रभावी रोग नियंत्रण होईल.