
kanda bajarbhav: बांग्लादेशमध्ये कांदा कमी असल्याने देशात कांदा मुबलक उपलब्ध व्हावा या हेतूने त्या देशाने भारतासह विविध ठिकाणांहून आयात होणाऱ्या कांद्यावरील शुल्क काढून टाकले होते. १५ जानेवारीपर्यंत हे आयातशुल्क काढले होते. त्यानंतर हे आयातशुल्क १० टक्केप्रमाणे पुन्हा लावण्यात आल्याने भारतातून बांग्लादेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावर परिणाम होईल अशी भीती होती. मात्र शुक्रवारी आठवड्याच्या शेवट आलेला असताना लासलगाव बाजारात कांदा वधारलेला दिसून आला.
गुरूवारी आणि बुधवारी लासलगाव आणि परिसरातील बाजारात कांद्याच्या किंमती १८५० ते १९५० रुपये प्रति क्विंटल होत्या. मात्र शुक्रवारी १७ जानेवारी रोजी त्या पुन्हा वाढून २१०० रुपये सरासरी प्रति क्विंटल अशा झाल्या. याच काळात बांग्लादेशातील कांदा निर्यातही वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान भारतातून केवळ बांग्लादेशच नव्हे, तर इतरही देशांना कांदा निर्यात होते. याशिवाय मागील काही दिवसांपासून पोंगलच्या सणामुळे दक्षिणेकडे कांदा मागणी वाढली आहे. ती या आठवडाभर टिकून राहणार असून सध्या तरी कांद्याचे बाजारभाव काही दिवस टिकून राहतील.
कांदा किंमती का टिकून राहिल्या?
खरीपाचा कांदा हंगाम आता संपत चालला असून लेट खरीपाचा कांदा अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी खराब झाला, तर काही ठिकाणी एकरी केवळ १० ते १५ क्विंटल लेट खरीप कांद्याचे उत्पादन मिळाले आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर २४ या काळात खरीप आणि लेट खरीप कांद्याची भारतातील आवक ही सुमारे ४० लाख मे. टन इतकी होती. यंदा खरीप कांद्याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे, असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात आजतागायत सप्टेंबर ते डिसेंबर या काळातली कांदा आवक ही मागच्या वर्षीप्रमाणेच म्हणजेच सुमारे ४० लाख क्विंटलच्या आसपास आहे.
निर्यातही यंदा वाढली असून डिसेंबरपर्यंत सुमारे पावणे सहा लाख मे. टन कांदा निर्यात झालेला आहे. तर ७० हजार टन प्रक्रियायुक्त कांदा ७० हजार में. टन इतका निर्यात झाला असून त्यासाठी सुमारे ५ लाख मे. टन ओला कांदा वापरला गेला आहे. या शिवाय देशांतर्गत रोजची गरज सुमारे ५० ते ७५ हजार मे. टन इतकी असून त्यासाठीही कांदा वापरला जात आहे. हे लक्षात घेता सध्या तरी कांदा दर टिकून आहेत.