
Agri-Photovoltaic : मराठवाड्यात आधुनिक तंत्रज्ञानावर अनेक शेतकरी शेती करत असून आता संशोधनासाठी परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेती करत असतानाच शेतातून सौर ऊर्जाही मिळवता येते आणि त्याच ऊर्जेचा किंवा वीजेचा वापर पुन्हा शेतासाठी करून ठिंबकसारख्या उच्च तंत्रासाठी करता येणे हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या आधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सौरऊर्जा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाचे संशोधन कार्य चालू आहे. या प्रकल्पाद्वारे सौरऊर्जा निर्मिती व शेतीतील आधुनिक प्रयोग यांचा समन्वय साधून भविष्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. अभ्यासू शेतकऱ्यांना हा प्रकल्प वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पाहता येईल.