Tomato harvesting : सध्या अनेक शेतकरी टोमॅटोची काढणी करून बाजारात विक्रीसाठीसाठी आणत आहेत. मात्र ज्यांचा टोमॅटो लवकरच बाजारात येणार आहे, त्यांनी आधी काढणीसंदर्भातील ही माहिती वाचणे आवश्यक आहे.
टोमॅटो रोप लावल्यापासून जातीनुसार साधारणतः ६५ ते ७० दिवसांनी फळांची तोडणी सुरू होते. त्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तोडणी करावी लागते.
प्रक्रियेसाठी पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावीत. परंतु, बाजारासाठी फळे निम्मी लाल व निम्मी हिरवी असताना तोडावीत. फळे जर लांबच्या बाजारपेठेसाठी पाठवायची असतील, तर पिवळा ठिपका पडलेली फळे तोडावीत.
अशी फळे वाहतुकीत चांगली पिकतात. गुलाबी लालसर झालेली फळे मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी, तर पूर्ण लाल झालेली फळे स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पाठवावीत.
फळांची काढणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी.
तोडणी अगोदर तीन ते चार दिवस कीडनाशकांची फवारणी करू नयेय अन्यथा फळांवर कीडनाशकांचे डाग व फळांमध्ये विषारीपणा राहतो. फळांची काढणी झाल्यावर फळे सावलीत आणावीत व त्यांची आकारानुसार वर्गवारी करावी.
नासकी, तडा गेलेली, रोगट फळे बाजूला काढावीत. चांगली फळे लाकडी खोक्यांत किंवा प्लॅस्टिक क्रेटमध्ये व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावीत.02:31 PM












