
Maharshtra Weather Update:देशात ३० मे २०२४ ला आगमन झालेल्या नैरूक्त मान्सूनचे १५ ऑक्टोबर ला निर्गमन झाले. परंतु त्याच दिवसापासून ईशान्य मान्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील ४ राज्यात स्थिरावून सोमवार दि.२७ जानेवारीला देशातून निघून गेला आहे.
दरम्यान गेल्या १० दिवसापासून किमान तापमानातील चढ उतारासहित, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा २३ जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली, तर कोकण, खान्देश, नाशिक नगर, छत्रपती संभाजीनगर अशा १३ जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही.
पुढील १० ते १२ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी पर्यंत किमान तापमानात २ ते ३ डिग्रीने वाढ होवून थंडी अजुन कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे समजू नये, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
पावसाची शक्यता कशी असेल?
सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील आठवड्यात, २-३ दिवस, केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता (१ ते २ मिमी.) खालील जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जाणवू शकते.
शनिवार दि. १ फेब्रुवारी – लातूर नांदेड बीड सोलापूर जिल्ह्यात, रविवार दि.२ फेब्रुवारी -कोल्हापूर सातारा पुणे नगर, सं. नगर, बीड जालना, अकोला बुलढाणा वर्धा अमरावती हिंगोली वाशिम जिल्ह्यात , बुधवार दि.५ फेब्रुवारी- लातूर नांदेड यवतमाळ, वर्धा नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील.
पाऊस का?
सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती जाणवत आहे. शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंब वर्तुळकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे विदर्भ मराठवाड्यासहित संपूर्ण उत्तर अर्ध महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात असल्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे.
हेच प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेंव्हा बं. उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेमुळे व वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील वर स्पष्टीत जिल्ह्यात व परिसरात १,२, ५ फेब्रुवारी ला ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली असल्याचे श्री. खुळे यांनी सांगितले आहे.