Minister of Agriculture : अमरावती येथील कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विम्यासंदर्भात जाहीर वक्तव्य करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. मागेही भाजपाच्या एका केंद्रीय राज्यमंत्र्याने शेतकऱ्यांविषयी असेच आक्षेपार्ह बोलून स्वत:वर आणि पक्षावरही टिका ओढवून घेतली होती. सत्ताधारी पक्षातील हा सलग दुसरा प्रकार असल्याने शेतकरी संतप्त होत आहेत.
काय म्हणाले कृषी मंत्री
जिल्हा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी ॲड. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री या नात्याने शुक्रवारी अमरावती येथे आले होते. त्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, आजकाल भिकारीसुद्धा १ रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा देतो. त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी शेतकऱ्यांची किंमत भिकाऱ्यांपेक्षाही कमी केल्याची टिका होत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे.
एक रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला जातो, म्हणजे सरकार काही उपकार करत नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे, तर पीक विम्यातील भ्रष्टाचाराबद्दल विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांना राग येतो. शेतकरी हा अन्नदाता असल्याने त्याला सन्मान दिला पाहिजे, त्यामुळे कृषी मंत्र्यांनी तत्काळ मंत्रीपद सोडण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने अतुल लोंढे यांनी केली आहे.
दरम्यान १ रुपयांत पीक विमा दिल्याने यंदा अनेक लोकांनी बोगस पीकविमा अर्ज भरून सरकारला लुटण्याचा प्रयत्न केला. सुमारे ४ लाख लोकांनी असे गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले आहे, त्यातील काही परराज्यातील कंपन्याही आहेत. कुणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून आम्ही पीक विम्यासंदर्भात धोरण ठरविणार असून पुढेही ही योजना सुरू राहणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी म्हटले आहे.












