Cotton purchase : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेंदुर्णी येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. त्यामुळे कापूस खरेदी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यंदा कापसाचे दर अपेक्षापेक्षा कमी राहिलेले आहेत. तर सरकारी खरेदीत अडचणी येत आहे. दुसरीकडे त्याला पूरक म्हणून घेतलेल्य सोयाबीन पिकाचेही दर पडलेले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांची कापूस खरेदी सीसीआयने बंद केल्याने अनेकांचा कापूस घरात पडून आहे. बाजारात सध्या कापसाचे भाव अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठविण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन दिलासादायक ठरणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












