Solar Agriculture Pump : सौर कृषी पंपाबाबत मोठी घोषणा; आता पंधरा दिवसातच मिळणार पंप..

Solar Agriculture

Solar Agriculture Pump : सौर कृषी पंप शेतात बसविण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता पैसे भरल्यानंतर अवघ्या १५ दिवसात कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले असून सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल, असे त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यातील शेतकरी अधिकाधिक प्रगत आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढावे, यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’, ‘मागेल त्याला सौर ऊर्जा पंप’ आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024’ जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही 5 वर्षासाठी असून एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविली जाणार आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या योजनेमध्ये राज्यातील 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा वापर करणारे सर्व शेतीपंप ग्राहक पात्र आहेत.

भारतातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज असून त्यासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” घोषित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील जवळपास 45 लाख शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे.

महाराष्ट्रात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत. या ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16 टक्के हे कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 द.ल.युनिट आहे. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीचा काळात 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

Leave a Reply