Onion market price : राज्यात लेट खरीपाच्या लाल कांद्याची आवक आता अंतिम टप्प्यात असून या आठवड्यात कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत खूपच घटलेली दिसून आली. दुसरकडे दरातही काही प्रमाणात घसरण झाली, तर आठवड्याच्या शेवटी लाल कांद्याचे दर टिकून राहिल्याचे दिसून आले.
दरम्यान उन्हाळी कांद्याची आवक या आठवड्यात होताना दिसत असून उन्हाळी कांदय्ाला सरासरी २२ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. रविवार दिनांक २ मार्च रोजी राज्यात एकूण ४३ हजार क्विंटल आवक झाली. त्यात उन्हाळी कांदा ५ हजार क्विंटल होता. मागच्या रविवारी राज्यात सुमारे १ लाख क्विंटल कांदा आवक झाली. त्यानंतर सोमवारी ही आवक वाढून थेट ३ लाख ३३ हजार क्विंटल इतकी झाली. त्यामुळे नाशिक जिल्हयातील बाजारात सरासरी २३ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
त्यानंतर मंगळवार २ लाख ९३ हजार क्विंटल आवक झाली, तर बुधवारी २६ फेब्रुवारीला अवघी ८१ हजार क्विंटल आवक झाली. त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव २२ रुपयांवरून पुन्हा वाढले आणि ते २३ रुपये प्रति किलो झाले. बुधवारी महाशिवरात्रीच्या सुटीमुळे ही स्थिती होती. गुरूवारी मात्र आवक पुन्हा वाढली आणि २ लाख ४३ हजार क्विंटल इतकी होऊन बाजारभाव नाशिक जिल्ह्यात टिकून राहिलेत. शुक्रवारीही २ लाख ६७ हजार क्विंटल आवक होऊन नाशिक बाजारात भाव १ रुपयांनी कमी होऊन सरासरी २२ रुपये इतके राहिले. शनिवारी १ लाख २४ हजार क्विंटल आवक झाली आणि नाशिक जिल्ह्यात सरासरी २१५० रुपयांचा दर लाल कांद्याला बाजारभाव मिळाला. रविवारी पुणे बाजारात सरासरी २२ रुपये प्रति क्विंटल, तर सोलापूरला २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राहिले.
यंदा रब्बी हंगामाची लागवड उशिरा झाल्याने राज्यात रब्बीचा कांदा अजूनतरी पूर्ण क्षमतेने आलेला नाही. म्हणून मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तरी लाल कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरतीच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.












