Budget Session: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दिनांक ३ मार्चपासून सुरू होत असून अधिवेशनात विरोधक मंत्री धनंजय मुंडे आणि शिक्षा सुनावलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी वाल्मिक कराडचे जवळचे संबंधि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. तर कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील स्थगितीची सुनावणी ५ मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून त्यांचाही राजीनामा विरोधक मागून सरकारची कोंडी करू शकतात.
सीआयडीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा व्यावसायिक पार्टनर आणि अत्यंत विश्वासू व जवळचा असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा अंतिम चौकशीत दोषी निघाला तर मी स्वतः राजीनामा देईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतल्याचा दावा त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी केला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही नैतिकतेच्या मुद्दयावर मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे अशा अर्थाचे वक्तव्य केल्याने मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला बळ मिळाल्याचे मानले जात असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किंवा मधल्या काळात त्यांचा राजीनामा पडण्याच शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणुकीच्या आरोपावरून नाशिक न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या दोन वर्षाच्या शिक्षे प्रकरणी स्थगिती मिळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं तर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला होता. यांच्या शिक्षेचा शनिवारी (ता.01) निकाल होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मार्चला होणार आहे. त्यामुळे येत्या पाच मार्चला कोकाटे यांना जेल की बिल मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी अंजली दिघोळे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. आज होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना सुनावणी लांबणीवर पडल्याने कृषिमंत्री कोकाटे यांची धाकधूक वाढली आहे.
त्यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवार ही कायम असून आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात ही या मुद्द्यावरून विरोधक त्यांच्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
एकूणच या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक होणार हे नक्की झाले असून या मंत्र्यांचा राजीनामा पडणार का? याची अनेकांना प्रतिक्षा आहे.












