Gram Panchayat : प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श व महिलास्नेही ग्रामपंचायत विकसित होणार..

Gram Panchayat  : देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि कन्या स्नेही किमान एक आदर्श ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालयाने आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या सोहोळ्याचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील निवडक ग्रामपंचायतींमधील 1500 हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध मंत्रालये/विभाग, ग्रामीण विकास आणि पंचायती राज राज्य संस्था आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींसह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आपल्या भाषणात महिला आणि मुलांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक आरोग्य उपक्रमांचा व्यापक आढावा सादर केला. केंद्र सरकारच्या योजना वंचित लोकांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यात निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सशक्त महिला, सशक्त पंचायतद्वारे सशक्त भारताची घडण” या दृष्टिकोनाला बळकटी देण्यासाठी पंचायत-स्तरीय सहकार्य महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी नेतृत्व कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 770 आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींची निवड करण्याची घोषणा केली. प्रा. बघेल यांनी महिला ग्रामप्रधानांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, विधवा आणि दिव्यांगजनांसाठी निवृत्तीवेतन योजना, आयुष्मान भारत आणि अवयवदान सारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीत पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

गेल्या अकरा वर्षांत झालेली प्रगती प्रतिबिंबित करणारी ही परिषद महिला-केंद्रित विकासाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकते. 8 मार्च 2025 रोजी देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये देशव्यापी महिला ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे. ती आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायत उपक्रमाच्या उद्दिष्टांना तळागाळातील पातळीवर पुढे नेण्यासाठी, स्त्री-पुरुष समानता आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या बांधिलकीला बळकटी देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

Leave a Reply