
state government : शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना वाघांसह वन्यप्राण्यांचा त्रास होत असतो. वाघांचा अधिवास असलेल्या कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळाल्यास हिंस्र वन्य प्राणी आणि मानव संघर्ष टाळता येणे शक्य आहे. यासाठी कोअर वन क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरण निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
वन मंत्री नाईक म्हणाले, हिंस्र प्राण्यांना त्यांच्या अधिवासात त्यांचे भक्ष मिळाल्यास ते त्या क्षेत्रातून बाहेर जाणार नाहीत. त्यांच्या अधिवास क्षेत्रात तृणभक्षक प्राण्यांचा वावर वाढविण्यासाठी अशा प्राण्यांकरिता तेथे कुरण निर्मिती आवश्यक आहे. अशा कोअर वन क्षेत्रात वन विभागामार्फत फणस, जांभूळ, सिताफळ आदी झाडांचे लागवड करून तृणभक्षक प्राण्यांसाठी अन्नाची उपलब्धता करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
राज्याच्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पांमुळे राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. विविध राज्यांमध्ये तेथील उद्योग घटकांनी प्राणी संग्रहालयात ठेवण्यासाठी वाघाची मागणी केल्यास राज्यातील व्याघ्र संरक्षण प्रकल्पामध्ये असलेले वाघ अशा प्राणी संग्रहालयात देण्याबाबत केंद्राकडे परवानगी मागण्यात आली आहे, असेही वनमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.
जंगलाच्या शेजारील गावातील ग्रामस्थांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे याकरिता डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना राबविण्यात येत असून या योजनेद्वारे ग्रामस्थांना रोजगार प्रशिक्षण, गॅस वाटप, बायोगॅस, सोलर दिवे, सौर कुंपण, फेनसिंग असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच या योजनेअंतर्गत संरक्षित क्षेत्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांना सौर कुंपण देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
माटोरा येथील संरक्षित वनामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या दोन घटना घडल्या असून मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसास प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात आले असून प्रचलित नियमातील तरतुदीनुसार प्रत्येकास उर्वरित पुढील 15 लाख रुपये देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे वनमंत्री यांनी सांगितले.
वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष टाळणे यासंदर्भात अधिक उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधितासमवेत अधिवेशन दरम्यान बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिल्या.