फळबाग लागवड योजनेला १०० टक्के अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांत दिले जाते.

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget Session 2023) शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत, शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा (Crop Insurance) अशा योजनांचा समावेश आहे.

तसेच धान उत्पादकांसाठी बोनस (Paddy Bonus), मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सानुग्रह अनुदान या सारख्या घोषणाही सरकराने केल्या आहेत. या घोषणा करतानाच शेतीसाठी विविध योजनाही राबविल्या जाणार असल्याचे सांगितले.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Phundkar Phalbag Lagawad Yojana 2023) ही राज्य सरकारच्या अशाच योजनांपैकी एक आहे. ही योजना राज्यात २०१८-१९ मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना राज्य सरकारच्या योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

योजनेसाठी अनुदान –

फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांत दिले जाते. पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के देण्यात येणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायतीसाठी ९० टक्के तर कोरडवाहूसाठी ८० टक्के असणे गरजेचे आहे.

हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याला स्वखर्चाने झाडे आणून जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे ठेवावे लागेल. अशाप्रकारे लाभार्थी शेतकऱ्याला तीन वर्षांत १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

योजनेसाठी पात्रता व कागदपत्रे –

फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्याला ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.

सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. संस्थात्मक लाभार्थांना या योजनेचा लाभ देय नाही.

शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.

७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.

परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.

इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येवू शकतो. तसेच या योजनेच्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.

source:-agrowon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *