
kanda bajarbhav : शुक्रवारपर्यंत सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल असणार कांदा शनिवारी आणि नंतर रविवारी थेट ४०० ते ५०० रुपयांनी घसरून सरासरी १३०० ते १५०० रुपयांवर प्रति क्विंटल आलेला आहे. सोमवारी राज्याची एकूण आवक २ लाख ७३ हजार क्विंटल इतकी होती. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक कमी आहे. मात्र तरीही बाजारभाव घसरले आहेत. केवळ राज्यातच नव्हे, तर देशातील बाजारातही कांदा बाजारभाव खाली आलेले आहेत.
सोमवारी सोलापूरमध्ये लाल कांद्या ३१ हजार ६०० क्विंटल, पुण्यात साधारणत: २३ हजार क्विंटल, नाशिकमध्ये ७२ हजार क्विंटल, तर पोळ कांद्याची नाशिकमध्ये १७ हजार क्विंटल आणि उन्हाळी कांद्याची ४७ हजार क्विंटल, तर अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याची २८ हजार २५७ क्विंटल आवक झाली. राज्यात एकूणच उन्हाळी कांद्याची आवक आता वाढताना दिसत असून सोमवारी ती ७७ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली.
दरम्यान सोमवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याला १७०० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला. तर उन्हाळी कांद्याला १३५० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला. व्यापाऱ्यांनी सांगितले की यंदा उन्हाळी कांदा वाढणार अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे व्यापारी दबावात आले. तसेच निर्यात शुल्क हटविले जाईल याचीही व्यापारी आणि निर्यातदार वाट पहात होते. त्यामुळेच कांदा खरेदी मंदावली आणि बाजारभाव पडल्याचे सांगितले जात आहे.्
दरम्यान यंदा देशात आजतागायत १०.२६ लाख हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती असून ही लागवड जास्त असल्याचे सगळीकडे सांगितले जात आहे. मध्यंतरी माध्यमांमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणावर बातम्या आल्या. त्याचाही दबाव व्यापाऱ्यांवर होता. त्यामुळे त्यांनी खरेदीत हात आखडता घेतला. या बातम्यांमुळेच कांदा बाजारभाव दबावात आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मागच्या वर्षी रबी हंगामात १०.८७ लाख हेक्टर वर कांदा लागवड होती. यंदाची लागवड ही पाच वर्षांच्या सरासरी इतकी असून मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. मात्र चुकीची माहिती आणि गाजावाजा झाल्याने बाजार दबावात आले.
शेतकऱ्यांनी आपला कांदा एकदम बाजारात आणू नये. ज्यांच्याकडे उन्हाळी कांदा साठविण्यासाठी सोय असेल, त्यांनी तो साठवावा आणि टप्प्या टप्प्याने बाजारात आणावा असे आवाहन करण्यात येत आहे.