Rice auction: भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्री जाहीर केली आहे. १९ आणि २० मार्च २०२५ रोजी होणाऱ्या ई-लिलावासाठी महाराष्ट्रातून १०,००० मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लिलावाचा शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होईल, हे पाहणे गरजेचे आहे.
या लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि तांदूळ उत्पादकांना भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकृत ई-लिलाव सेवा प्रदाता, एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया ७२ तासांच्या आत पूर्ण केली जाईल. लिलावासाठी काही अटी लागू आहेत. किमान खरेदी प्रमाण एका मेट्रिक टनपर्यंत ठेवण्यात आले असून, एका खरेदीदाराला जास्तीत जास्त ७,००० मेट्रिक टन तांदूळ खरेदी करता येणार आहे.
दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर तांदळाचा पुरवठा होणार आहे. याचा थेट परिणाम तांदळाच्या बाजारभावावर होईल. तांदळाच्या दरात स्थिरता येऊ शकते, पण यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला भाव मिळेल की भाव कमी होईल, असा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही धान किंवा भाताची विक्री केलेली नाही. त्यांना चांगला बाजारभाव अपेक्षित होता. मात्र बाजारात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या तांदळामुळे त्यांच्या माल विक्रीवर आणि त्यांना मिळणाऱ्या भावावर परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लिलावाच्या माध्यमातून मोठ्या व्यापाऱ्यांना साठा उपलब्ध होईल, त्यामुळे खासगी बाजारात मागणी काही प्रमाणात कमी होऊ शकते. परिणामी, स्थानिक बाजारात शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तांदूळ विक्री करताना बाजारातील बदलांचा अंदाज घेतला पाहिजे. सरकारी लिलावामुळे दर खाली जाऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी तांदूळ विक्रीची घाई न करता योग्य संधीची वाट पाहणे श्रेयस्कर ठरेल, असा सल्ला या क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.
दरम्यान शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. सरकारच्या खुल्या बाजार विक्री योजनेमुळे तांदळाच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा फायदा ग्राहकांना होईल, मात्र शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती संमिश्र राहू शकते.02:59 PM