Hapus Bhav : दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे.
यंदा १ एप्रिल ते १० मे, अशी ४० दिवस कोकणच्या हापूसची सर्वाधिक आवक राहणार आहे. गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतही उत्पादन कमी झाल्याने यावर्षी ग्राहकांना कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होणार असून, भावही तेजीत राहतील.
मागील वर्षी फेब्रुवारीपासून आंब्याची मोठी आवक सुरू झाली होती; परंतु यावर्षी फेब्रुवारीमध्ये गतवर्षीपेक्षा ५८३ टन कमी आवक झाली आहे. गतवर्षी मार्चच्या सुरुवातीला सरासरी ४० हजार पेट्यांची आवक होत होती.

आवक ४० टक्क्यांनी कमी
गतवर्षी फेब्रुवारीपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. यावर्षी खराब हवामानामुळे आवक घटली आहे. हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल ते १० मेदरम्यान राहील. दक्षिणेतील आंब्याची आवकही कमी होण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळमध्ये उत्पादन कमी आहे. गुजरातमध्येही अशीच स्थिती आहे. यावर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के कमी राहण्याची शक्यता आहे.












