Mka bajarbhav : एप्रिलमध्ये मक्याच्या बाजारभावात वाढीची शक्यता? कसा राहिल अंदाज..

mka bajarbhav : मक्याच्या बाजारभावासंदर्भात बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे यांनी मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार, एप्रिल २०२५ मध्ये मक्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा या वाढीवर मोठा प्रभाव राहणार आहे.

भारतातील स्थिती
भारतामध्ये मक्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि उत्तर प्रदेश ही प्रमुख उत्पादक राज्ये आहेत.
– २०२४-२५ मध्ये देशातील मक्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किंचित वाढण्याची शक्यता आहे.
– देशातील मक्याचे एकूण उत्पादन अंदाजे ३३.६० मिलियन टन होण्याचा अंदाज आहे.
– मागणीच्या तुलनेत पुरवठा काहीसा स्थिर राहू शकतो, त्यामुळे बाजारातील किंमती तुलनेने मजबूत राहू शकतात.

जागतिक परिस्थिती आणि त्याचा परिणाम
– यूएसडीए च्या अंदाजानुसार, जागतिक मक्याचे उत्पादन १.२ टक्क्यांनी वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारभावावर होऊ शकतो.
– चीन आणि युरोपमध्ये मक्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे जागतिक बाजारात किंमती काहीशा दबावात राहू शकतात.
– मात्र, भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत पुरवठ्याचा मोठा प्रभाव राहील आणि उन्हाळी मक्याच्या उत्पादनावर हवामानाचा प्रभाव असल्यास किंमती अधिक वाढू शकतात.

मागील तीन वर्षांतील नांदगाव बाजारातील मका बाजारभाव
२०२२ : सरासरी बाजारभाव १७५० ते २००० दरम्यान होता
२०२३ : सरासरी बाजारभाव १८५० ते २१०० दरम्यान होता
२०२४: सरासरी बाजारभाव १९३० ते २२५० दरम्यान होता

बाजारभावावरील संभाव्य प्रभाव
– मार्च २०२५ अखेर मक्याची सरासरी बाजार किंमत १९३१ ते २२३६ रुपये प्रति क्विंटल होती.
– एप्रिल महिन्यात ही किंमत २००० ते २२५० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
– महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये दर २१०० ते २२५० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, तर इतर राज्यांमध्ये किंमती यापेक्षा थोड्या कमी असू शकतात.
– सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) स्तरही या दरांवर परिणाम करू शकतो.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
– मक्याच्या दरात होणाऱ्या संभाव्य वाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विक्रीचा योग्य कालावधी निवडावा.
– व्यापाऱ्यांशी योग्य करार करून ठराविक दरांवर मक्याची विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.
– हवामानाच्या स्थितीवर विशेष लक्ष द्यावे, कारण अचानक बदल झाल्यास उत्पादन आणि बाजारभाव दोन्ही प्रभावित होऊ शकतात.
– जास्त मागणी असलेल्या औद्योगिक वापरासाठी मक्याचा योग्य दर्जा राखावा.

एप्रिल २०२५ मध्ये मक्याच्या बाजारभावात चढ-उतार राहण्याची शक्यता असून, दर वाढण्याची अधिक संधी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये एप्रिल महिन्यात मका प्रति क्विंटल २१०० ते २३०० या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave a Reply