farmers Comforting: राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे. एकूण २१६९ कोटी रुपयांचा हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपये मिळतात.
२६ ऑक्टोबर २०२३ रोजी शिर्डी येथून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर पाच हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून, आतापर्यंत ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले आहेत.
डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरित झाला. या टप्प्यात राज्यातील ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना १९६७.१२ कोटी रुपये मिळाले. त्यानंतर केंद्र शासनाने आणखी ६५,०४७ लाभार्थ्यांना मदत दिली.
नमो शेतकरी महासन्मान निधीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून, त्याचा फायदा शेतीपूरक उपक्रमांसाठीही होत आहे. आज हा सहावा हप्ता जमा झाल्यानंतर, पुढील टप्प्यात अधिक लाभ मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.












