Agricultural University : कोल्हापुरात कृषी विद्यापीठाची जागा गेली, आयटी हबसाठी जागा हस्तांतरित.

Agricultural University : कोल्हापुरातील शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा आता आयटी हबसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात आयटी उद्योगांना चालना मिळणार असली तरी कृषी संशोधन आणि शिक्षणासाठी पर्यायी जागा निश्चित करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी विद्यापीठाला या बदल्यात कागल, पन्हाळा, हातकणंगले आणि राधानगरी तालुक्यांमध्ये ६० ते १०० हेक्टर शेतीयोग्य पर्यायी जागा देण्याचे ठरवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या सहमतीने येत्या दहा दिवसांत ही जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पूर्वी शहराबाहेर असलेली ही जागा आता मध्यवर्ती ठिकाणी आल्याने तेथे आयटी हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विद्यापीठासाठी नवी जागा विकसित करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, कृषी अभ्यासक आणि संशोधक यावर चिंता व्यक्त करत आहेत. नवीन जागा संशोधन आणि शिक्षणासाठी पुरेशी आणि अनुकूल असेल का, याबाबत संभ्रम कायम आहे.

शासनाने कृषी विद्यापीठासाठी दिली जाणारी पर्यायी जागा योग्य असेल आणि संशोधनाला कोणताही अडथळा येणार नाही, याची खात्री करून घ्यावी, अशी मागणी कृषी तज्ज्ञांकडून होत आहे.

Leave a Reply