Rain forecast : आधुनिक तंत्रामुळे यंदा पावसाचा अंदाज मिळणार अधिक अचूक..

Rain forecast : भारतातील हवामान खात्याने (IMD) मॉन्सूनचा अंदाज अधिक अचूक करण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर सुरू केला आहे. देशातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने, असा अचूक अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

नवीन पद्धतीमध्ये सांख्यिकीय अंदाज प्रणाली आणि मल्टी-मॉडेल एन्सेम्बल (MME) ही पद्धत वापरली जात आहे. या पद्धतीमुळे विविध जागतिक हवामान मॉडेल्सचा एकत्रित अभ्यास करून दरमहा व हंगामी पावसाचा अंदाज लावता येतो. २०२१ पासून या पद्धतीचा वापर सुरू असून यामुळे अंदाज अधिक अचूक झाले आहेत.

२००७ ते २०२४ या कालावधीत हवामान खात्याच्या अंदाजातील चुका २१ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. २०१४-१५ मधील कमी पावसाचे, २०२३ च्या सामान्याखाली आणि २०२४ च्या अधिक पावसाचे अचूक भाकीत हवामान खात्याने वर्तवले होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी पेरणी, खत व पाणी नियोजन करता येते.

शेतीसाठी हवामान सेवा मजबूत करण्यासाठी ‘मिशन मॉसम’ नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण देशभर हवामान माहिती संकलनासाठी नवीन केंद्रे तयार केली जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलाचे अधिक अचूक अंदाज मिळवले जात आहेत.

या योजनेमुळे शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती त्यांच्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवण्याचे काम होत आहे. स्थानिक स्तरावर कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. शेतकऱ्यांकडून अभिप्राय घेऊन ही सेवा आणखी चांगली केली जात आहे.

हवामान विभाग उपग्रह तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. यामुळे चक्रीवादळ, जोरदार पाऊस, वादळ यांचा वेळीच इशारा मिळतो. हवामान खातं आणि इस्रो मिळून नवीन उपग्रह तयार करत आहेत जे अधिक अचूक आणि लहान पातळीवरील हवामान बदलही ओळखू शकतील.

या सर्व बदलांचा उद्देश म्हणजे शेतकरी हवामानाच्या बदलांसाठी तयार राहावा, आपत्तीपासून स्वतःचे आणि आपल्या शेतीचे संरक्षण करावे आणि हवामानाशी जुळवून शेती अधिक यशस्वी करावी.

Leave a Reply