
our government : गुरुवार दि. १० एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलवरील सर्व ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होणार असून महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ऊर्जा यांसारख्या विभागांशी संबंधित सेवा, अर्ज, प्रमाणपत्रे व तक्रारी या कालावधीत दाखल करता येणार नाहीत.
राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून या काळात पोर्टलवर देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे नियोजित काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पोर्टलवरील सर्व सेवा आणि प्रणाली १० ते १४ एप्रिल या पाच दिवसांत काही काळासाठी पूर्णतः बंद असतील.
शेतकऱ्यांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, या काळात ७/१२ उतारा, फेरफार, पीक कर्जासाठी लागणारी प्रमाणपत्रे, शेतकरी प्रमाणपत्र, पशुपालकांना अनुदानासाठी लागणारे दस्तावेज, वीज जोडणीसाठी अर्ज, कृषी यांत्रिकीकरणासंदर्भातील योजना, सहकारी संस्थांशी संबंधित ऑनलाईन सेवा या सर्वांमध्ये अडथळा येईल.
या पाच दिवसांत बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये सुट्ट्या असतील, मात्र काही ठिकाणी कार्यालये सुरू राहतील. तरीही, ऑनलाईन सेवा बंद असल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.
माहिती तंत्रज्ञान विभागाने नागरिक, शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायती व सेवा केंद्र चालवणाऱ्या व्यक्तींना आवाहन केले आहे की, आवश्यक कामकाज व सेवांचे नियोजन १० एप्रिलपूर्वीच करून घ्यावे, जेणेकरून अडथळे टाळता येतील.