Monsoon update : यंदाच्या जूनमध्ये फक्त ९६% पाऊस पडणार; काय आहे मॉन्सूनचा अंदाज..

Monsoon update : यंदा जून महिन्यात भारतात फक्त ९६% पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट हवामान संस्थेने वर्तविला आहे. जूनमध्ये मान्सूनची सुरुवात होते आणि खरीप हंगामाची पेरणीही याच महिन्यात सुरू होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास पेरणीसाठी अडथळे येऊ शकतात. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि काही कोरडवाहू भागात बऱ्याचशा पिकांसाठी पावसावरच अवलंबून असलेली शेती आहे, तिथे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मात्र उर्वरित मान्सूनचा अंदाज पाहता, पुढचे महिने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतात, असेही हा अंदाज सांगत आहे. जुलै महिन्यात १०२% पाऊस, ऑगस्टमध्ये १०८% आणि सप्टेंबरमध्ये १०४% पाऊस होण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, २०२५ चा एकंदर मान्सून ‘सामान्य’ राहील आणि देशभरात सरासरीपेक्षा थोडा अधिक म्हणजे १०३% पाऊस होईल. ही अंदाजित रक्कम दीर्घकालीन सरासरी ८६८.६ मिमीच्या तुलनेत दिली आहे.

पावसाच्या या अंदाजामुळे खरीप हंगामात भात, बाजरी, मक्यापासून ते कडधान्ये आणि तेलबियांपर्यंतची अनेक पिके चांगली येतील अशी अपेक्षा आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटकमधील कोरडवाहू भागांना याचा फायदा होईल. केरळ, गोवा आणि पश्चिम घाटातील भागात तर अधिक पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये स्कायमेटने १०२% पावसाचा अंदाज वर्तविला होता आणि प्रत्यक्षात देशात १०७.३% पाऊस पडला होता. त्यामुळे यंदाचाही अंदाज खरा ठरण्याची शक्यता दिसत आहे.

यंदा जूनमध्ये सुरुवात कमी पावसाने होणार असली तरी उर्वरित महिने शेतकऱ्यांसाठी चांगली आशा घेऊन येतील, अशी शक्यता आहे.