Onion Price : शनिवारपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये येणाऱ्या कांद्याच्या आवकेत घट झाली असून रविवारी दिनांक १३ एप्रिल रोजी तर कांदा आवक अगदी नगण्य झाली. मात्र तरीही बाजारभाव वाढण्याऐवजी ते घटतच चालल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. देशातही आवक ही सरासरी इतकीच असल्याने भाव पाहिजे तसे वाढलेले नाहीत. परिणामी कांदा बाजारभाव वाढायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात ते कमी झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठेबाजीसाठी हे भाव पाडल्याचे आरोप शेतकऱ्यांचे प्रतिनिधी करत आहेत.
शनिवारी १२ एप्रिलला राज्यात एकूण १ लाख ३९ हजार क्विंटल आवक होती. पुणे जिल्ह्यात सरासरी ११५० तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला सरासरी ११०० आणि लाल कांद्याला ८५०चा घसरता दर मिळाला. दुसरीकडे रविवारी राज्यात कांद्याची नीचांकी म्हणजेच केवळ ३१ हजार ६०० क्विंटल आवक झाली. तरीही पुणे जिल्ह्यात कांद्याला सरासरी हजार रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. अहिल्यानगरला ११०० आणि छत्रपती संभाजी नगरला हे बाजारभाव ७५० रुपयांच्याही खाली आलेत.
मागणी आणि पुरवठा या गणितानुसार बाजारात शेतमालाचे व्यवहार होतात. मात्र आवक घटून आणि मागणी वाढत असतानाही भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यंदा अवकाळीसह उशिरा लागवडीमुळे कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे. त्यामुळे उत्पादन मागच्या वर्षी इतकेच राहण्याची शक्यता असूनही भाव मात्र मागच्या वर्षीपेक्षा पडलेले आहेत. हे सर्व कमी पैशातील साठेबाजीसाठी व्यापारी आणि संबंधित घटकांनी केलेले उद्योग असून भविष्यात हाच माल तो जास्त किंमतीला विकतील असे शेतकऱ्यांनी आरोप केले आहेत.
दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफची खरेदी लवकरच सुरू होणार असून या खरेदीत नेहमी घोटाळे होत असल्याचे आरोप होतात. त्यातील काही आरोप सिद्ध होऊन संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. या खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आडून व्यापारीच खरेदी करतात आणि त्यामुळेच त्यातून जास्त नफा मिळविण्यासाठी या लोकांनी एकत्र येऊन बाजारभाव पाडण्याचे कारस्थान तर केले नाही ना? असा सवाल शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विचारताना दिसत आहे.












