Zinga Exports : अमेरिकेच्या निर्णयाने देशातल झिंगा निर्यातदारांना मोठा दिलासा…

Zinga Exports : भारतीय झिंगा निर्यातदारांसाठी एक सकारात्मक बदल घडला आहे. अमेरिका सरकारने झिंग्यावर लावण्याच्या तयारीत असलेला २६ टक्के अतिरिक्त शुल्क मागे घेतल्याने आता सुमारे ४०,००० टन झिंगा अमेरिकेकडे रवाना केला जाणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून थांबलेली निर्यात पुन्हा सुरू होणार असून मत्स्यव्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे भारतातील निर्यातदारांना त्यांच्या झिंग्याच्या साठ्यावरून होणारे नुकसान टळणार असून सुमारे २,००० कंटेनरमध्ये अडकलेला झिंगा माल अखेर अमेरिकेच्या बाजारात पोहोचणार आहे. यामुळे देशांतर्गत मत्स्य व्यवसायास नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास मत्स्य निर्यात संघटनांनी व्यक्त केला आहे.

भारतीय समुद्री खाद्य निर्यात विकास प्राधिकरणाचे (MPEDA) महासचिव के. एन. राघवन यांनी सांगितले की, “आता आम्हाला अमेरिकेतील इतर देशांप्रमाणेच संधी मिळाली आहे. ज्या ऑर्डर रखडल्या होत्या, त्या आता पूर्ण करता येतील.”

सध्या भारतातून अमेरिकेला झिंगा पाठवताना सुमारे १७.७ टक्के शुल्क आकारले जाते, ज्यात अँटी-डम्पिंग व प्रतिकारी शुल्क समाविष्ट आहे. मात्र चीनकडून येणाऱ्या झिंग्यावर हेच शुल्क १४५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे तुलनेने भारताला अधिक स्पर्धात्मक स्थान मिळणार आहे.

या संपूर्ण घडामोडीमुळे झिंगा उत्पादन करणारे शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांना मोठा दिलासा मिळेल. जागतिक बाजारात भारतीय झिंग्याची मागणी टिकवून ठेवण्यासाठी ही संधी अत्यंत मोलाची ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.