Onion arrival : देशभरातील कांदा आवक वाढली; महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात आघाडीवर…

Onion arrival : देशभरात एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत कांदा आवकेमध्ये मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये देशभरातील एकूण कांदा आवक ४,७७,३९२.७० टन होती, तर यंदा एप्रिल २०२५ मध्ये ही आवक ७,१२,२५०.४४ टनांवर पोहोचली. याचा अर्थ देशभरात यंदा एप्रिल महिन्यातील कांदा आवक सुमारे २,३४,८५७.७४ टनांनी वाढली आहे. ही वाढ सुमारे ४९ टक्क्यांच्या आसपास आहे.

एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि बिहार या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांतील स्थिती खालीलप्रमाणे होती.

महाराष्ट्रात एप्रिल २०२४ मध्ये १,७१,९२२.४२ टन कांद्याची आवक झाली होती. एप्रिल २०२५ मध्ये ही संख्या वाढून २,५४,४४०.९० टनांवर पोहोचली. म्हणजे जवळपास ८२,५१८ टनांनी वाढ झाली.

मध्यप्रदेशमध्ये मागील वर्षीच्या याच कालावधीत ३०,५९२.३८ टन कांदा आला होता, तर यंदा ही आवक १,२६,४७८.३९ टन इतकी झाली. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक मोठी वाढ नोंदवली गेली असून, ही वाढ जवळपास चार पट आहे.

गुजरातमधील कांदा आवक ९९,४४०.०६ टनांवरून वाढून १,३१,६३८.७१ टनांवर पोहोचली. येथेही मोठी वाढ दिसून आली आहे.

राजस्थानमध्ये १५,६८९.११ टनांवरून कांदा आवक २६,४७५.०६ टनांवर गेली. उत्तरप्रदेशमध्ये मागील वर्षी ७२,५६७.३७ टन कांदा आला होता, तर यंदा ८१,७६९.३७ टन नोंदवला गेला. बिहारमध्ये गेल्यावर्षी ५२९.८० टन कांदा आला होता, जो यंदा ६१५.७८ टनांवर गेला.

कर्नाटक या राज्यात मात्र मोठी घट झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये १७,६७५ टन कांदा आला होता, परंतु एप्रिल २०२५ मध्ये ही संख्या केवळ ५,४९६ टनांवर आली. कर्नाटकमध्ये सुमारे ६९ टक्क्यांची घट नोंदवली गेली.

एकूण पाहता देशातील बहुतांश राज्यांमध्ये कांदा आवक वाढली आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात दाखल झाला आहे.