Agricultural irrigation : शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि पाणी हे शेतीचे सर्वात मूलभूत आणि अमूल्य घटक. परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवला जात आहे.
या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढवण्यावर भर दिला जाणार असून, शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन हे या उपक्रमाचे केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांची अडचण समजून घेणे, पाणी वापर संस्थांमार्फत त्यांना अधिक सक्षम करणे, तसेच पिक पद्धतींमध्ये बदल करून उत्पादनक्षमता वाढवण्याचे प्रयत्न यामध्ये करण्यात येणार आहेत.
या काळात कालव्यांची स्वच्छता, सिंचन प्रकल्पांचा आढावा, जल पुनर्भरण, भू-संपादन आणि पुनर्वसनाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय, ई-सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पाणीपट्टी आकारणी, थकबाकी वसुली, आणि अनधिकृत पाणी उपसा यावरही कारवाई करून पाण्याचा न्याय्य आणि नियोजित वापर सुनिश्चित केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था यांच्या समन्वयातून पाण्याचा वापर आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
हा उपक्रम म्हणजे केवळ एका विभागाची मोहीम नसून, तो शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर एकत्रित उपाय शोधण्याचा प्रयत्न आहे. शेती आणि पाणी यांचे अतूट नाते लक्षात घेता, ही कृती पंधरवडा राज्याच्या कृषी भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.












