Ladki bahin scheme : राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत करून त्यांच्या गरजा भागवण्यास हातभार लावणे. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र एप्रिल २०२५ पासून या योजनेतील काही लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम न देता केवळ ५०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा बदल मुख्यतः केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा शेतकरी महिलांसाठी लागू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. सरकारचे म्हणणे आहे की जेव्हा एका लाभार्थ्याला एका योजनेतून आधीच मदत दिली जात आहे, तेव्हा दुसऱ्या योजनेतून त्यालाच पुन्हा पूर्ण रक्कम देणे गरजेचे नाही. त्यामुळे अशा महिलांना लाडकी बहिण योजनेतून आता फक्त ५०० रुपये मिळणार आहेत.
सरकारने हा निर्णय घेतल्यावर काही राजकीय पक्षांनी यावर टीका केली आहे. विरोधकांनी सरकारवर आरोप केला आहे की, निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण आता त्या वचनापासून मागे हटण्यात आले आहे. काही नेत्यांनी याला महिलांशी विश्वासघात असेही म्हटले आहे.
दुसरीकडे, सरकारने हे आरोप फेटाळले असून स्पष्टीकरण दिले आहे की, ज्या महिला अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेत नाहीत, त्यांना लाडकी बहिण योजनेतील संपूर्ण रक्कम म्हणजेच १५०० रुपये मिळतच राहणार आहेत. तसेच भविष्यात राज्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार लाभाची रक्कम वाढवण्याचाही विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे शेतकरी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, अनेक जणींना आपल्याला किती रक्कम मिळणार याबाबत खात्री वाटत नाही. त्यामुळे योजनेच्या अटी व शर्ती स्पष्टपणे समजावून घेणे आणि ग्रामपंचायतीकडून माहिती घेत राहणे गरजेचे आहे.












