Devendra Fadnvis : राज्याच्या कृषीमंत्र्यांची केली मुख्यमंत्र्यांनी कोंडी; हे अधिकार काढून घेतले…

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अलीकडील राजकीय भूमिकांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता त्यांच्यावर सरकारमधूनच दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नुकतेच कृषी खात्यातील बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेतले असून, कृषी आयुक्तांच्या बदल्याचाही अधिकार मंत्र्यांकडून काढून घेतला आहे.

त्यामुळे कृषी खात्यातील बदल्यांवर नियंत्रण असलेले सर्व अधिकार मंत्र्यांकडून काढून घेण्यात आले आहेत. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच माणिकराव कोकाटे यांचाही पत्ता मंत्रीमंडळातून कापला जाण्याची शक्यता दबक्या आवाजात चर्चेत आहे.

कृषी विभागातील बदल्या हे अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले प्रकरण आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असतानाही, कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदलीचे राजकारण, शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला मिळत नसणे, या मुद्द्यांवरून प्रशासनाची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांकडून बदल्यांच्या निर्णयात कथित हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे. परिणामी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अधिकार थेट स्वत:कडे घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे. दरम्यान मागच्या कृषीमंत्र्यांच्या काळात कृषी खात्यातील बदल्यांमध्ये कोट्यधींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे.

मंत्र्यांवर गुन्हा आणि वादग्रस्त वक्तव्य
कृषी मंत्री कोकाटे यांना एका गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. सध्या शिक्षेला स्थगिती मिळाली असली, तरी त्यांच्यावरील शिक्षेची टांगती तलवार कायम आहे. याशिवाय अलीकडेच त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांसोबत केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. यावरून अनेक शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करत राजीनाम्याची मागणी केली होती.

एनडीसीसी बँकेतील कर्ज थकबाकीचा मुद्दा
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एनडीसीसी बँक) माजी संचालक आहेत. माहिती अधिकारातून उघड झालेल्या कागदपत्रांनुसार कोकाटे यांनी स्वतःवर असलेले कृषी कर्ज परत केलेले नाही, असे समोर आले. स्वतः कृषी मंत्री असूनही कर्ज थकवणाऱ्या यादीत असलेले त्यांचे नाव हे विरोधकांसाठी मुद्दा बनला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी करणाऱ्या मंत्र्यांनी स्वतःचे कर्ज न फेडल्याचे समोर आल्याने सरकारची विश्वासार्हता डागाळली गेली आहे.

या साऱ्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि शेतकरी संघटनांनी यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सत्ताधाऱ्यांमध्येही कोकाटे यांच्या भूमिकेवर नाराजी असल्याचे बोलले जाते. कृषी मंत्री कोकाटे यांच्याभोवती वादांचे सावट गडद होत चालले आहे. बदल्यांचे अधिकार काढून घेतल्याने त्यांची पत कमी झाली असून, कर्ज थकबाकी व वादग्रस्त वक्तव्य यामुळे त्यांच्यावरचा नैतिक दबावही वाढत चालला आहे.