Onion purchase : नाफेडकडून कांदा खरेदी कधीपर्यंत सुरू होणार? काय आहेत अटी…

Onion purchase : नाफेडने २०२५ च्या रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रातील कांदा खरेदी सुरू करण्याची तयारी केली असून, यंदा राज्यातून सुमारे १.५० लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी नाफेडने सहकारी संस्थांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत नाफेडच्या सदस्य संस्था, सहकारी सोसायट्या व प्राथमिक कृषी पतसंस्था यांना प्राधान्य दिले आहे. नाफेडच्या खरेदीच्या तयारीमुळे शेतकऱ्यांना भाव वाढण्याची अपेक्षा असून ही खरेदी एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना थेट खात्यात परतावा
नाफेडने स्पष्ट केलं आहे की, कांदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना १०० टक्के पैसे थेट आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातील. शेतकऱ्यांची माहिती, विकलेली कांद्याची मात्रा, दर व कागदपत्रांची पडताळणी यावर आधारित डेटा पोर्टलवर अपडेट होताच, तीन कामकाजाच्या दिवसांत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.

शेतकऱ्यांसाठी कांदा खरेदीच्या अटी
या खरेदी योजनेचा लाभ फक्त प्रत्यक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. व्यापारी किंवा दलाल यांच्याकडून कांदा खरेदी केला जाणार नाही. शेतकऱ्याचे शेत जिओ-टॅग केलेले असणे आवश्यक आहे, आणि ही माहिती संबंधित पोर्टलवर नोंदवलेली पाहिजे. तसेच, शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक असलेले बँक खाते असणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित सहकारी संस्थेचे सदस्य असणे गरजेचे आहे. संस्था कांदा खरेदीची नोंद, वजन, ग्रेडिंग व दर यांची नोंद डिजिटल पद्धतीने करेल आणि त्यानंतर शेतकऱ्याला थेट पैसे मिळतील.

रिकव्हरीची अट – ए ग्रेड कांद्यावर भर
साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. नाफेडने ‘ए ग्रेड’ कांद्याचे किमान ६८ टक्के रिकव्हरी प्रमाण मान्य केलं आहे. जर संस्थेने यापेक्षा जास्त रिकव्हरीची हमी दिली आणि प्रत्यक्षात कमी निघाली, तर नाफेड नुकसान संस्थेकडून वसूल करू शकते.

कांदा चाळीची क्षमता व इतर अटी
नाशिकसाठी संस्थेकडे किमान ५,००० मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ असावी. इतर जिल्ह्यांत ही मर्यादा २,००० मेट्रिक टन आहे. चाळी पाण्याच्या साचापासून सुरक्षित जागी असाव्यात, आणि त्यात CCTV, वजन काटा, वायुवीजन, QR कोड, आणि चांगला रस्ता असावा. या चाळी फक्त नाफेडच्या वापरासाठीच असाव्यात.

निविदा भरायची अंतिम तारीख
या प्रक्रियेसाठी इच्छुक सहकारी संस्थांनी २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आपले अर्ज व कागदपत्रे नाशिक येथील नाफेड कार्यालयात सादर करावयाची आहेत. यासाठी बँक हमी, बिनव्याजी ठेव, निविदा शुल्क अशा आर्थिक अटीही आहेत.

नाफेडच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची आणि हमीभाव मिळवण्याची संधी निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून संरक्षण देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.