
tur ,soyabin bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे भाव वाढले तरी ते हमीभावापेक्षा कमी राहिल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यातील (१३ ते २० एप्रिल २०२५) साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार, तूर आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांमध्ये किंमतींच्या बाबतीत भिन्न प्रवाह दिसून आले. या चढउतारामुळे शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक ठरणार आहे.
मागील आठड्यातील अहवालानुसार तुरीच्या बाजारभावात किरकोळ चढ-उतार झाल्याचे निरीक्षणात आले. सरासरी बाजारभाव रुपये ७२७८ प्रती क्विंटल इतका नोंदवला गेला, जो याआधीच्या आठवड्यात रुपये ६७१२ होता. याचा अर्थ असा की तुरीच्या किमतीत सुमारे सहाशे रुपयांची वाढ झाली आहे. यामागे काही बाजार समित्यांमधील पुरवठ्यात झालेली घसरण, तसेच निर्यात मागणीतील थोडीशी सुधारणा हे प्रमुख घटक आहेत. तथापि, मागणी स्थिर नसल्यामुळे किमती पुन्हा घसरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साठवणुकीऐवजी टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा विचार करावा.
दुसरीकडे, सोयाबीनच्या बाजारभावात मागील आठवड्यात फारसा बदल झाला नाही. सरासरी बाजारभाव रुपये ४५०२ प्रती क्विंटल राहिला. याआधीच्या आठवड्यातही जवळपास हाच दर होता. मागील काही आठवड्यांत सोयाबीनने स्थैर्य राखले आहे, मात्र दर वाढीसाठी कुठलीही ठोस घडामोड झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलबियांच्या किमती, आयात-निर्यात धोरणे आणि देशांतर्गत तेल उत्पादन उद्योगाची मागणी यावर भविष्यातील दर अवलंबून असतील. सध्या तरी साठवणुकीस सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी साठवणूक करावी असे जाणकारांचे म्हणणे आहे.