
Kanda surgical : पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लावले आहेत. आता त्यात आपल्याकडच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनोख्या सर्जिकल स्ट्राईकची भर पडणार असून मे महिन्यात भारतीय कांदा आशियाच्या बाजारात निर्यातीचा धमाका करण्याच्या तयारीत आहे. परिणामी दोन आठवड्यानंतर स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.
कांदा निर्यातीतून संपूर्ण जगाची उलाढाल ही साधारणत: ९ अब्ज डॉलरची आहे. दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड १.१० अब्ज डॉलर, तिसऱ्या क्रमांकावर स्पेन ७७५ दशलक्ष डॉलर, चौथ्या क्रमांकावर भारत ७५० दशलक्ष डॉलर त्यात चीनचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. जवळपास ३ अब्ज डॉलरची कांदा निर्यात एकटा चीन करतो. तर भारत चौथ्या क्रमांकवर आहे. तर जागतिक कांदा निर्यातीत पाकिस्तानचा वाटा आहे केवळ सरासरी ७० दशलक्ष डॉलर म्हणजेच भारताच्या निर्यातीच्या केवळ ८ ते ९ टक्के. पाकिस्तान प्रामुख्याने पुढील देशांना कांदा निर्यात करतो. २६% निर्यात मलेशियाला, १४.५ % निर्यात युएईला, १४ % कांदा निर्यात श्रीलंकेत, ११% टक्के कांदा निर्यात ओमान, कुवेत आणि कतार या देशांना, ५.६% कांदा निर्यात सौदी अरेबियाला, ३% निर्यात सिंगापूरला त्यानंतर बहारिन, ब्रुनेई, व्हिएतनाम या देशांना सर्व मिळून केवळ १ टक्का, तर बांग्लादेशला मात्र केवळ एक टक्क्यापेक्षाही कमी कांदा निर्यात करतो.
मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा बाजारभाव आटोक्यात राहावे यासाठी भारताच्या केंद्र सरकारने निर्यातबंदीसह निर्यातीवर निर्बंध लावले होते. त्यामुळे आपल्याकडून कांदा निर्यातीवर मर्यादा आल्या. त्यामुळे जागतिक बाजारात जी पोकळी निर्माण झाली, तिचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि तब्बल २ लाख २० हजार मे. टन कांदा निर्यात केली. त्यामुळे त्या देशात स्थानिक बाजारात कांद्याचे दर ३५० रुपये किलोवर पोहोचले मात्र निर्यातीतून त्यांनी परकीय गंगाजळी वाढवून घेतली.
यंदा पाकिस्तानमध्ये कांदा लागवड जास्त असून एप्रिलमध्ये त्यांचा कांदा हंगाम संपला आहे. याशिवाय अलिकडेच श्रीलंकेला निर्यात केलेल्या कांद्याच्या कंटेनरमध्ये मादक द्रव्याची तस्करी झाल्याचे आढळून आल्याने त्या देशात पाकिस्तानची प्रतिमा खराब झाली आहे. परिणामी आता श्रीलंकेतून भारतीय कांद्याला मागणी वाढू शकते. पहलगाम प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यानंतरही पाकिस्तनाची प्रतिमा जागतिक बाजारात खराब होऊन निर्यातीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. परिणामी मे मध्ये भारतीय कांद्याला निर्यातीत मोकळीक मिळणार असून त्याचा परिणाम स्थानिक बाजारातील शेतकऱ्यांच्या कांद्याला २ ते ३ रुपयांनी क्विंटलमागे भाव वाढून मिळू शकतो असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
याशिवाय लवकरच नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कांदा खरेदी सुरू होऊ शकते. त्यामुळेही कांदा बाजारात २ ते ५ रुपयांनी भाव वाढणार असून वाढलेली निर्यात आणि सरकारी खरेदी यामुळे मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव किलोमागे ४ ते ९ रुपयांनी वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे. सध्या लासलगाव बाजारात कांद्याचे बाजारभाव सरासरी १२०० रुपये क्विंटल असून मे महिन्यातील संभाव्य वाढ लक्षात घेता ते पुन्हा सरासरी १६०० ते २००० रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतात असा अंदाज आहे.