Tomato ,kanda Rate : टोमॅटो व कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच; शेतकऱ्यांची चिंता वाढली..

prices of tomatoes and onions : मागील आठवड्यात (१३ ते २० एप्रिल २०२५) टोमॅटो आणि कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या साप्ताहिक अहवालानुसार, या दोन महत्त्वाच्या भाजीपाला पिकांमध्ये दरवाढीऐवजी दरकपात दिसून आली.

टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण नोंदली गेली. मागील आठवड्यात टोमॅटोचा सरासरी दर ८६७रु. प्रति क्विंटल होता, जो त्याआधीच्या काही आठवड्यांत १५०० रु च्या आसपास होता. सध्या टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुरवठा वाढला असून, मागणी तुलनेत कमी आहे. यामुळे दरात सुमारे ४२ टक्क्यांची घसरण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघणं कठीण जात आहे.

कांद्याच्या बाबतीतही असाच कल दिसून आला. आठवड्याच्या अखेरीस कांद्याचा सरासरी दर १०८७ रु प्रति क्विंटल नोंदवला गेला, जो काही आठवड्यांपूर्वी १६०० च्या पुढे होता. कांद्याच्या दरातही ३२ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. नवीन पिकाचा पुरवठा वाढल्यामुळे बाजारात स्पर्धा तीव्र झाली असून, व्यापारी दर कमी करून खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ बिघडण्याची शक्यता असून, बाजार हस्तक्षेप आवश्यक बनतो. सरकारने हमीभावावर खरेदी, निर्यात धोरणात शिथिलता आणि साठवणूक क्षमता वाढविणे यासारखे उपाय तत्काळ राबवावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत बाजारातील चढउतार लक्षात घेता, शेतकऱ्यांनी उत्पादकतेपेक्षा बाजारभावाची माहिती घेऊन पिक निवड करावी, असा सल्ला कृषी विश्लेषक देत आहेत.