Tur maize market price : गेल्या आठवड्यात तूर आणि मक्याच्या बाजारभावात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. तुरीच्या बाजारभावात घट झाली असून, मक्याचा बाजारभाव तुलनेत स्थिर राहिल्याचे दिसून आले.
तुरीचा मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव ७०५० रुपये प्रति क्विंटल इतका होता. मात्र या आठवड्यात तो ६७९२ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. म्हणजेच तुरीच्या दरात सुमारे २५८ रुपयांची घट झाली आहे. मागील काही आठवड्यांपासून तुरीच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळत होते, मात्र या आठवड्यात घट अधिक ठळक होती. यावर्षी तुरीसाठी केंद्र सरकारने ७५५० रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव (MSP) जाहीर केला आहे. त्यामुळे सद्याच्या बाजारभावाची तुलना केली असता, तुरीचा दर हमीभावाच्या खाली गेला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये, पुणे, कोल्हापूर या बाजारांमध्ये तुरीचे दर जास्त म्हणजेच ७००० रुपये किंवा त्याहून थोडे जास्त नोंदवले गेले. तर औरंगाबाद, परभणी या भागात तुलनेत दर थोडा कमी, सुमारे ६८०० ते ६९०० रुपये दरम्यान होता. शेतकऱ्यांनी विक्री करताना स्थानिक बाजारात दराची तपासणी करून निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला जात आहे.
मक्याच्या बाजारभावाबाबत बोलायचे झाले तर, गेल्या आठवड्यात सरासरी दर २१५० रुपये प्रति क्विंटल इतका होता आणि सध्या तो २१४३ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. किंमतीत फक्त ७ रुपयांची सौम्य घट झाली आहे, त्यामुळे मक्याचा बाजार सध्या स्थिरतेच्या टप्प्यावर आहे असे म्हणता येईल. मक्याचा यावर्षीचा सरकारी हमीभाव (MSP) २२२५ रुपये प्रति क्विंटल इतका आहे. त्यामुळे सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा खालीच आहे.
महाराष्ट्रातील नाशिक आणि सोलापूर बाजारांमध्ये मक्याचे दर तुलनेने जास्त होते, तर जळगाव आणि अकोला येथे मक्याचे दर थोडेसे कमी दिसले. सध्याच्या स्थिर बाजारभावाचा उपयोग करत शेतकऱ्यांनी योग्य वेळ साधून विक्री करावी, असा सल्ला दिला जात आहे.
एकूण पाहता, तुरीमध्ये घट तर मक्यामध्ये त्यातले त्यात स्थिरता दिसली आहे. पुढील आठवड्यात बाजारभावात बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमधील दरावर सतत लक्ष ठेवावे.












