Pipeline from the dam : सांगली जिल्ह्यातील शेतीला धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी..

Pipeline from the dam : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून, वारणा आणि कडवी नद्यांवरून उपसा करून बंद पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रारंभिक मंजुरी दिली आहे.
 

खोची (ता. हातकणंगले) येथील वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाकुर्डे उपसा योजनेच्या धर्तीवर शासकीय उपसा सिंचन योजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पाणी शेतापर्यंत थेट बंद पाईपलाईनने पोहोचवले जाणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार असून अधिक कार्यक्षम पाणी व्यवस्थापन शक्य होणार आहे.

तसेच, कडवी नदीवर सावे (ता. शाहूवाडी) गावाच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीतून पाणी उचलून बंद पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याबाबतही सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता व सह सचिव प्रसाद नार्वेकर उपस्थित होते. आमदार विनय कोरे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले की, कृष्णा पाणी तंटा लवादाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच या योजना राबवाव्यात. पाणी उपलब्धतेचा आणि लाभक्षेत्राचा सविस्तर अभ्यास करून सर्वेक्षण तत्काळ सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुणेगाव धरणातील सिंचनासाठी मंजूर पाणी शेतकऱ्यांना वेळेत मिळावे, यासाठी स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत विखे-पाटील यांनी अधिकारी आणि पाटबंधारे यंत्रणेला स्पष्ट इशारा देत सांगितले की, पाणी वितरणात विलंब झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.10:52 AM