
Weather upadate : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची सांगावा आला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे, ज्याला आपण सर्वसामान्यपणे मॉन्सून म्हणतो, यंदा अंदमान-निकोबार बेट समूहावर दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालचे उपसागर आणि निकोबार बेटांवर दाखल होईल.
मॉन्सूनचे आगमन
मॉन्सून अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्यामुळे केरळमध्ये त्याचे लवकर आगमन होण्याची आशा आहे. दीर्घकालीन ऐतिहासिक आकडेवारीनुसार, साधारणतः २१ मेपर्यंत मॉन्सून पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो. यंदा १३ मे रोजी मॉन्सून अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षीदेखील मॉन्सून १९ मे रोजी दक्षिण अंदमानात दाखल झाला होता.
यंदाच्या पावसाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
हवामान स्थिती
विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीवर आहे. सध्या तटस्थ स्थिती आहे, म्हणजेच ‘ला-निना’ नाही आणि ‘एल-निनो’ नाही. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल – आयओडी) सध्या तटस्थ स्थितीत आहे.
हवामानाच्या या स्थितीमुळे मॉन्सूनच्या आगमनावर आणि पावसाच्या वितरणावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.