Kharif season : यंदा खतांचा अतिरिक्त खर्च टाळायचा ,तर खरीप हंगामापूर्वी ‘हे’ एक काम कराच …

Kharif season : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकऱ्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे खतांची खरेदी. अनेक वेळा शेतकरी खतांच्या किमती वाढण्याच्या भीतीने ती अगोदरच खरेदी करतात. मात्र, अंदाजाने किंवा पारंपरिक पद्धतीने खते खरेदी करणं शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि जमिनीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

जमिनीच्या पोषणद्रव्यांची विविधता
प्रत्येक शेतातील मातीची रचना आणि पोषणद्रव्यांची मात्रा वेगवेगळी असते. काही जमिनींत नत्र जास्त प्रमाणात असतो, तर काहींमध्ये स्फुरद कमी असतो. अशा स्थितीत, जर आपण अंदाजाने खते वापरली तर काही पोषणद्रव्यांची जास्ती होऊन जमिनीचे नुकसान होऊ शकते, तर काही घटकांचा अभाव राहू शकतो.

खतांचा अतिरेक आणि त्याचे परिणाम
खतांचा अतिरेक झाल्यास जमिनीचा पोत बिघडतो. उदा. नत्राचं अति प्रमाण असल्यास मुळे जास्त फुटतात, पण फळधारण कमी होते. स्फुरदाची कमतरता असल्यास मुळांची वाढ खुंटते. यामुळे कीटक व रोगांनाही पिकांवर आक्रमण करण्याची संधी मिळते.

माती परीक्षणाचे फायदे
माती परीक्षण केल्याने जमिनीत कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे, याची अचूक माहिती मिळते. यामुळे गरजेपेक्षा जास्त खते टाकण्याची गरज राहत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचा खर्च वाचतो आणि पिकांची गुणवत्ता वाढते. जमिनीचा पोत सुधारतो आणि दीर्घकाळासाठी शाश्वत शेतीची दिशा मिळते.

माती परीक्षण: खर्च नव्हे तर गुंतवणूक
माती परीक्षण हा खर्च नव्हे तर गुंतवणूक आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून खतांच्या टंचाई सदृश स्थिती निर्माण करून किमती वाढविण्याआधी माती तपासणी करून गरजेनुसारच खते खरेदी करा. हे केल्यास खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही फायदा होईल.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, हे निश्चितपणे त्यांना अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर ठरणार आहे.