
Export onion & wheat : देशात यंदा गव्हाचे उत्पादन भरघोस झाले असून, सरकारच्या खरेदीचेही उच्चांक मोडले जात आहेत. अनुकूल हवामान, योग्य वेळी पाऊस, रोगरहित पीक आणि सुधारित बियाण्यांमुळे यंदाचा गहू उत्पादनाचा हंगाम विक्रमी ठरणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार यंदा 115.43 दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने हा अंदाज 117 दशलक्ष टन इतका वर्तविला आहे. गहू उत्पादनाचे हे आकडे मागील सर्व विक्रम मोडणारे आहेत. मात्र एवढ्या मोठ्या उत्पादनानंतरही सरकारकडून गव्हावरील निर्यातबंदी कायम आहे. त्यामुळे शेतकरी आणि उद्योग प्रतिनिधींनी सरकारकडे ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील गहू उत्पादकांनाही होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच कांद्याच्या निर्यातीवर असलेले शुल्क केंद्र सरकारने हटवले होते. त्यावेळी कांद्याचा पुरवठा देशांतर्गत भरपूर असूनही, निर्यात न करण्याची अडचण शेतकऱ्यांपुढे उभी राहिली होती. मात्र आता कांद्यावरून हे शुल्क हटवल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी गव्हाच्या निर्यातीवरील बंदीही उठवावी, अशी मागणी केली आहे. गहू उत्पादकांना त्यांचा माल परदेशात चांगल्या दरात विकण्याची संधी मिळावी, यासाठी हा आग्रह आहे.
भारतीय अन्न महामंडळाने (FCI) यंदा 29.6 दशलक्ष टन गहू खरेदी केला आहे, जो मागच्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी अधिक आहे. यंदा ही खरेदी 32.5 दशलक्ष टनांवर जाईल असा अंदाज आहे. सरकारी गोडाऊनमध्ये आणि खाजगी व्यापाऱ्यांकडे साठा भरपूर असूनही निर्यातबंदीमुळे देशांतर्गत पुरवठा वाढून बाजारभावावर ताण येत आहे. त्यामुळे देशांतर्गत दर कमी राहून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही.
गहू प्रक्रिया उद्योजकांकडील माहितीनुसार सरकारकडे आणि खाजगी क्षेत्राकडे पुरेसा साठा आहे, त्यामुळे आता निर्यात सुरू केली जाऊ शकते. 2022 मध्ये गहू निर्यातबंदी लागू करण्यात आली होती, कारण त्या वर्षी मार्चमध्ये अत्यंत उष्णता होती आणि उत्पादनात घट झाली होती. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असून गव्हाचे उत्पादन पुरेसे आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारकडे गहू निर्यातीवरील बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा गहू पुन्हा दिसणार आहे.