
Agricultural implements : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री सुलभ दरात उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य पुरस्कृत शेती यंत्रसामग्री खरेदी योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना शेती यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे, विविध यंत्रे यांसारखी शेतीसाठी आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय सामूहिकरित्या वापरासाठी असलेल्या कृषी यंत्र बँकांनाही मदत दिली जाईल. योजना ‘महाडीबीटी’ पोर्टलवर राबवली जाणार असून, पात्र शेतकऱ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाईल.
विशेषतः अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% किंवा जास्तीत जास्त १.२५ लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. इतर शेतकऱ्यांना ४०% किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये अनुदान मिळेल. यामुळे गरजूंना शेती यंत्रसामग्री सुलभ दरात मिळवता येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन केले जाणार आहे. लाभार्थ्यांची यादी, अनुदान वितरण व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ‘महा डीबीटी’ प्रणालीद्वारे होणार आहे. निधी थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाईल.
शेतीत यंत्रांचा वापर वाढल्यास उत्पादनक्षमता व कार्यक्षमता वाढते, तसेच कामाचा वेळ आणि खर्च कमी होतो. त्यामुळे खरीप हंगामात या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची संधी मिळणार आहे. लवकरच कृषी विभागाकडून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील.