
tur bajarbhav : तुर या डाळीच्या प्रमुख पिकाच्या बाजारभावाचा अंदाज घेतला असता, जून २०२५ मध्ये किमती काहीशा नरम राहण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून तुरीच्या किमती सतत घसरत असून, नोव्हेंबर २०२४ पासून यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. मागील तीन वर्षांच्या जून महिन्याच्या सरासरी किमती पाहता, त्या सुमारे ७९०० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिल्या होत्या, तर यंदा या किमती ७५०० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत उत्पादनात वाढ झालेली असून, सरकारने २०२४-२५ साठी तुरीच्या उत्पादनाचे लक्ष्य सुमारे ३५ लाख टन इतके जाहीर केले आहे. महाराष्ट्रात देखील यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने पुरवठा वाढण्याची चिन्हे आहेत. याशिवाय, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांतून देखील चांगले उत्पादन अपेक्षित आहे.
जागतिक स्तरावरही आफ्रिकन देशांमधून तुरीचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यापाऱ्यांना परदेशातून स्वस्त दरात तुरी उपलब्ध होत आहे. यामुळे स्थानिक बाजारात मागणीवर दबाव वाढतो आहे. स्थानिक APMC बाजारांतील व्यापारीही साठा वाढवण्यास साशंक आहेत. मागणी काहीशी स्थिर असली तरी पुरवठा वाढल्याने बाजारभाव घटण्याचे संकेत आहेत.
दरम्यान जून २०२५ साठी वर्तविण्यात आलेल्या FAQ ग्रेड तुरीच्या संभाव्य बाजारभाव श्रेणी ७५०० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहील, असा स्पष्ट अंदाज स्मार्ट प्रकल्पाच्या वतीने देण्यात आला आहे. मागील वर्षी जून महिन्यात सरासरी ८५००, तर २०२३ मध्ये ८०००रुपये इतका बाजारभाव होता. तुलनात्मक दृष्टिकोन ठेवता, यंदा ही श्रेणी किंचित कमी राहणार आहे.