
Youth jobs : नोकरी सुरू करणाऱ्या नव्या युवकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पहिल्यांदाच नोकरीला लागणाऱ्या तरुणांच्या ईपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खात्यात थेट १५,००० रुपये जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘ईएलआय’ (रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर योजना) ला मंजुरी देण्यात आली आहे.
ही योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत सुरू होणार असून, या दरम्यान जे युवक पहिल्यांदाच नोकरीला लागतील, त्यांना हा लाभ मिळणार आहे. योजनेचा उद्देश दोन वर्षांत देशभरात ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करणे असा आहे. त्यातील सुमारे १.९२ कोटी युवक हे पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करणारे असतील.
योजनेचा पहिला भाग कामगारांसाठी आहे. ईपीएफओ (भविष्य निर्वाह निधी कार्यालय) मध्ये नाव नोंदणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन – म्हणजेच १५,००० रुपयांपर्यंतची रक्कम – प्रोत्साहन म्हणून मिळेल. ही रक्कम दोन टप्प्यांत दिली जाईल – पहिला हप्ता सहा महिन्यांच्या सेवेनंतर आणि दुसरा हप्ता बारा महिन्यांच्या सेवेनंतर, त्याचबरोबर युवकाने आर्थिक साक्षरतेचा एक छोटा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेला असावा.
हे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात जमा होतील आणि त्यातील काही भाग काही काळासाठी बचत खात्यात वाचवून ठेवला जाईल. ठरावीक कालावधीनंतर कर्मचारी ही रक्कम काढू शकतो. यामुळे युवकांमध्ये बचतीची सवय लागेल आणि आर्थिक शिस्तही येईल.
या योजनेचा दुसरा भाग कंपन्यांसाठी आहे. ज्या कंपन्या नव्या कामगारांची भरती करतील त्यांना देखील सरकारकडून दरमहा ३,००० रुपयांपर्यंत रक्कम मिळेल. उत्पादन क्षेत्रात ही रक्कम पुढील दोन वर्षांसाठी वाढवली जाणार आहे.
केंद्र सरकारने या योजनेसाठी जवळपास ९९,४४६ कोटी रुपयांचा तरतूद केली असून, ही योजना रोजगार वाढवण्यासोबतच युवकांना स्थिर उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षिततेकडे घेऊन जाणारी ठरणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना याचा मोठा फायदा होणार आहे.