Turmeric research : मराठवाड्यात हळद संशोधनाला येणार गती; निधी वितरीत

Turmeric research : मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ प्रकल्पासाठी यापूर्वी मंजूर केलेल्या 100 कोटींपैकी उर्वरित 26 कोटी रुपयांचा निधी तत्काळ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च 709 कोटी रुपये असून, त्यास वित्त विभागाची मान्यता मिळालेली आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री गोगावले म्हणाले की, हळद लागवडीसाठी केवळ मराठवाडा नव्हे तर सांगली व कोकण भागातही उत्साह वाढला असून, शासनाच्या धोरणानुसार यास प्रोत्साहन देण्यात येईल.

दरम्यान, मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सदस्य हेमंत पाटील यांच्या हळद पिकावरील कार्याची प्रशंसा करताना सांगितले की, त्यांच्या प्रयत्नांची दखल कमोडिटी एक्सचेंजने घेतली असून त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी हळद पीक महत्त्वाचे ठरणार असून, या संशोधन केंद्राचा दूरगामी सकारात्मक परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले.