Agriculture abroad : शेतकरी बांधवांनो, यंदा परदेशातील शेती पाहायचीय? मग हे वाचाच…

Agriculture abroad : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत GeM पोर्टलवर १४ जुलै, २०२५ रोजी कृषी आयुक्तालयामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी साहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६ ही योजना राबविण्यात येत आहे.

सदर निविदा प्रक्रियेंतर्गत १८ जुलै, २०२५ रोजी निविदापूर्व सभा राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २५ जुलै, २०२५ रोजी दु.१२.०० वाजेपर्यंत आहे. GeM पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशनिहाय निविदांचे क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. युरोप दौरा १२ दिवसांचा असून GEM/2025/B/6443685, इस्राईल दौरा ९ दिवसांचा आहे त्यांचा GEM/2025/B/6443752 असा क्रमांक आहे. जपान दौरा १० दिवस GEM/2025/B/6443819, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स १२ दिवस दौरा असून GEM/2025/B/6443399 या क्रमांकाची निविदा आहे. चीन मध्ये ८ दिवस GEM/2025/B/6443459 या क्रमांकाची निविदा आहे. दक्षिण कोरिया १० दिवस दौरा असून त्याचा GEM/2025/B/6443596 असा निविदा क्रमांक आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.