kanda bajar bhav : भारतातून बांग्लादेशात शिलाँग मार्गे कांद्याची होतेय तस्करी?

kanda bajar bhav : बांग्लादेशात कांदा निर्यात कधी सुरू होईल आणि स्थानिक बाजारात कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादकांना धक्का देणारी एक बातमी पुढे येत असून सध्या मेघालयातून बांग्लादेशात तस्करीच्या माध्यमातून कांदा पाठवला जात असल्याचे समजत आहे.

यासंदर्भात बांग्लादेशातील काही व्यापाऱ्यांनी मराठवाड्यातील काही व्यापाऱ्यांना ही माहिती दिल्याचे खात्रीलायक रित्या समजत आहे. मात्र संबंधित बांग्लादेशातील व्यापाऱ्याची अजून पुष्टी झालेली नाही. असे असले तरी मेघालयातून कांदा, साखर अशा पदार्थांची अवैध मार्गाने तस्करीचे प्रकार या पूर्वीही घडलेले असून त्याविरोधात बीएसएफने कडक मोहीमही राबविली होती.

काही माध्यमातील माहितीनुसार, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये हजारो किलो कांदा बीएसएफच्या माध्यमातून मेघालय बांग्लादेश बॉर्डरवर जप्त करण्यात आला होता. त्यानंतर काही काळ ही तस्करी थांबली होती, मात्र आता पुन्हा नव्या मार्गांनी ती सुरू झाली असल्याचे समजत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस जंगलवाटांमधून मजुरांच्या साहाय्याने कांद्याचे पोती बांग्लादेशात पोहोचवले जात आहेत.

बांग्लादेशात सध्या कांद्याचा तुटवडा जाणवत असून, भाव वाढत आहेत. तेथील व्यापाऱ्यांनीही भारतातील काहींशी संवाद साधताना हे कबूल केले आहे की भारतातून मेघालयमार्गे कांदा अजूनही येत आहे. भारतात कांद्याचा दर १५ ते २० रुपये किलो असतानाच, बांग्लादेशात त्याचे दर ४० ते ५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे तस्करांना प्रति पोती शेकडो रुपयांचा नफा मिळतो. या आर्थिक फायद्यामुळे अनेकांनी या बेकायदेशीर व्यवहारात भाग घेतल्याचे समजते.

या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएसएफ आणि राज्य पोलीस संयुक्तपणे कारवाई करत आहेत. मात्र सीमाभागातील दुर्गम आणि डोंगराळ भाग, तसेच स्थानिकांची तस्करीसाठी मिळणारी साथ यामुळे कारवाईला मर्यादा येतात. काही प्रकरणांमध्ये तस्करांनी बीएसएफच्या जवानांवर हल्लेही केले असून, काही जवान जखमी झाल्याच्या नोंदी आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, २० जुलै २४ रोजी तस्करांशी झालेल्या चकमकीत बीएसएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला. तो जवान तस्करी रोखण्यासाठी घातलेल्या छाप्यात सहभागी होता.

बांग्लादेशात सध्या स्थानिक कांदा असला, तरी त्याची प्रत आता खालावत चालली असून लवकरच देशात कांद्याची मागणी वाढेल. मात्र अजूनही तेथील सरकारने आयातीची परवानगी दिली नसल्याने सध्या अशा रितीने तस्करीच्या मार्गाने कांदा बांग्लादेशात जात असल्याचे सांगितले जात आहे.