Onion arrival : दिनांक १३ जुलै ते १९ जुलै २०२५ या आठवड्यात महाराष्ट्रातील घाऊक बाजारांमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात स्थिर होते. विशेषतः उन्हाळी कांद्याला त्यातले त्यात बरा दर, तर लोकल कांद्याचे दर तुलनेने कमी राहिले.
या काळात संपूर्ण राज्यातील कांद्याची सरासरी आवक सुमारे ३ लाख क्विंटलच्या आसपास राहिली. त्यात मुख्यतः उन्हाळी कांद्याचे प्रमाण जास्त होते. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा आवक वाढल्याचे दिसून आले. दररोजच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात रोज सरासरी ५० हजार क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला. त्यात ६० ते ७० टक्के कांदा उन्हाळी होता, तर उर्वरित लोकल कांदा होता.
राज्यात उन्हाळी कांद्याला सरासरी दर १२५० ते १३५० रुपये प्रति क्विंटल मिळाला. नागपूर, नाशिक, पुणे आणि सातारा येथे उन्हाळी कांद्याला १६०० रुपयेपर्यंत कमाल दर मिळाला. याच काळात लोकल कांद्याचे दर मात्र ९०० ते ११५० रुपयांच्या दरम्यान राहिले. काही बाजारांमध्ये लोकल कांदा ८०० रुपयांपर्यंत खाली गेला.
नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला आठवड्याच्या सुरुवातीस १३१६ रुपये सरासरी दर होता, तर आठवड्याच्या अखेरीस हा दर किंचित घसरून १२६१ रुपये झाला. पुणे बाजारात उन्हाळी कांद्याचे दर आठवड्याभरात १४७२ रुपयांवरून १३५० रुपयांवर आले. नगर जिल्ह्यात दरांचा उतार आणि चढ यामध्ये फारसा मोठा फरक नव्हता. सोलापूरमध्ये मात्र लोकल कांद्याचे दर दररोज ११०० ते १५०० रुपयांदरम्यान हेलकावत होते.
दरवाढीचा विचार करता, १३ जुलै रोजी राज्यात कांद्याचा सरासरी दर सुमारे ११५० रुपये होता. मात्र १९ जुलैपर्यंत तो सरासरी ११०० रुपयांवर स्थिरावला. त्यामुळं कांद्याच्या दरात आठवड्याभरात मोठी घसरण झाली नाही, पण हलकासा उतार नोंदवला गेला. विशेषतः उन्हाळी कांदा मागणीसह बाजारात टिकून राहिला, पण लोकल कांद्याची आवक वाढल्याने त्याचे दर कमी राहिले.
या दरांमधून स्पष्ट होते की राज्यात उन्हाळी कांद्याला अजूनही शाश्वत मागणी आहे, तर लोकल कांद्याच्या तुलनेत त्याला बाजारात जास्त भाव मिळतो. मात्र आवक वाढली तर दरावर ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी आठवड्यात पावसाचा परिणाम आणि साठवणुकीचा खर्च यावर कांद्याच्या दराचा प्रवास ठरणार आहे.












