Dam storage : राज्यात आढळा, सीना, विसापूर १०० टक्के भरली, इतर ठिकाणी असा आहे धरणसाठा…

Dam storage :   दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरण १०० टक्के भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे. त्याशिवाय सीना आणि विसापुर धरणांनीही आपली क्षमता गाठली आहे.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ८३६० दलघफूट पाणी असून साठा ७५.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. निळवंडे धरण ८७.४३ टक्के भरले आहे. मुळा धरणात १९३६३ दलघफूट पाणी असून साठा ७४.४७ टक्के आहे. आढळा पूर्ण क्षमतेने भरले असून विसर्गही सुरू करण्यात आला आहे.

दक्षिण नगरमधील पिंपळगाव जोगड्या धरणाचा साठा ३४.८८ टक्के असून येडगाव व वडज ही धरणे अनुक्रमे ६२.६३ आणि ६८.५५ टक्के भरली आहेत. माणिकडोह मात्र २८.७६ टक्के भरले आहे. डिंभे आणि घोड या धरणांमध्ये अनुक्रमे ७६.५६ व ९४.४० टक्के साठा असून मांजर ओहोळ ८७.५३ टक्के भरले आहे. घाटघर व सीना पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही समाधानकारक साठा असून दारणा धरण ७७.९४ टक्के भरले आहे. गंगापुर ६१.६२, मुकणे ८३.७७ आणि करंजवण ६४.२० टक्के भरले आहे. गिरणा ५५.६६ टक्के तर वाघुर ६४.९६ टक्के भरले आहे.

उजनी धरण ९७.३९ टक्के भरले असून त्यातून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात ७६.५२ टीएमसी पाणी असून ७२.६९ टक्के साठा झाला आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९१.२९ टक्के भरले असून वारणा व दुधगंगा धरणांमधूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ८५.७९ टीएमसी साठा असून तो ८३.५१ टक्के भरला आहे. मात्र माजलगाव, मांजरा, सिद्धेश्वर, दुधना या धरणांत अजूनही कमी साठा असून ११ ते ४४ टक्क्यांच्या दरम्यान भराव आहे.

राज्याच्या विविध भागांत समाधानकारक पावसामुळे धरण साठ्यात मोठी भर पडत आहे. मात्र काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा असून तिथे पाणी नियोजन आवश्यक ठरणार आहे. जलसंपदा विभागाचे माजी अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी ही माहिती दिली आहे.