Agriculture Minister : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते (रमी) खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून, आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे यावर गंभीर भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेमुळे कोकाटे यांचा राजीनामा होणार का, हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये कोकाटे हे विधानसभेच्या कामकाजादरम्यान आपल्या मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा सुरू असताना कृषिमंत्री मोबाईलवर खेळ खेळत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. या व्हिडिओमुळे राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
कोकाटे यांनी यावर स्पष्टीकरण देताना, “मोबाईलवर जाहिरात आपोआप प्ले झाली होती आणि मी ती स्किप करत असताना १८ सेकंदाचा व्हिडिओ काढण्यात आला,” असे म्हटले आहे. मात्र, त्यांचे हे स्पष्टीकरण विरोधकांना आणि सर्वसामान्यांना फारसे पटलेले नाही.
अजित पवारांची भूमिका निर्णायक?
.
या प्रकरणाच्या गंभीरतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
“विधिमंडळ सभागृहात असताना गांभीर्य असणे गरजेचे आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काहीही स्पष्टीकरण दिले असले तरीही ते आमच्यासाठी भूषणावह नाही,” असे तटकरे यांनी स्पष्टपणे नमूद केले.
यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे यांना समज दिल्याचे वृत्त आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात या व्हिडिओवरून चर्चा झाल्याचेही सांगण्यात येते. त्यानंतर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातही चर्चा झाली.
अजित पवार हे शिस्तबद्ध राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गटातील कोणत्याही मंत्र्यावर गंभीर आरोप झाल्यास किंवा त्यांच्याकडून असे अशोभनीय वर्तन झाल्यास ते कठोर भूमिका घेण्यास कचरत नाहीत, हे यापूर्वीही दिसून आले आहे.
अलीकडेच याच प्रकरणावरून लातूरमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती, त्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा पदाचा राजीनामा घेतला होता. या पार्श्वभूमीवर, आता कोकाटे यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजीनाम्याची शक्यता किती?
राजकीय विश्लेषकांच्या मते, माणिकराव कोकाटे आज (मंगळवारी) तडकाफडकी राजीनामा देऊ शकतात. आज सकाळी कोकाटे यांनी पत्रकार परिषद बोलावली असून, या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते राजीनामा देणार की केवळ स्पष्टीकरण देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, पक्षाध्यक्ष अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीमुळे त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. सरकारची प्रतिमा जपण्यासाठी आणि विरोधकांना आयते कोलीत मिळू नये यासाठी महायुतीतील नेत्यांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्यावर जोर दिला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या तरी कोकाटे स्वतः राजीनामा देणार की, पक्षश्रेष्ठी त्यांचा राजीनामा घेणार, याबाबत अनिश्चितता आहे. परंतु, अजित पवारांचे संकेत आणि सरकारवरील वाढता दबाव पाहता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ‘गेम’ लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता अधिक आहे.












