
Good news : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची काल लंडनमध्ये महत्त्वाची भेट झाली. या बैठकीत भारत आणि ब्रिटन यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार-संधी वाढणार असून, कृषीमालाच्या निर्यातीसाठी नव्या बाजारपेठा खुले होणार आहेत.
या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये पाठवण्यात येणाऱ्या बहुतांश कृषी आणि अन्नप्रक्रियायुक्त उत्पादनांवरील आयात शुल्क आता रद्द होणार आहे. याचा थेट फायदा महाराष्ट्रातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. विशेषतः नाशिक, सोलापूर, लातूर, जालना या भागांतून होणारी कांदा व द्राक्ष निर्यात आता अधिक सोपी आणि फायदेशीर ठरणार आहे.
द्राक्षांची ब्रिटनमध्ये मोठी मागणी आहे. आतापर्यंत निर्यातीवर आयात शुल्क लागल्यामुळे स्पर्धा कठीण होती. पण या नव्या करारामुळे भारतीय द्राक्षांचा दर्जा आणि चव लक्षात घेता ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढण्याची शक्यता आहे. कांद्यालाही ब्रिटिश बाजारपेठेत मागणी असून, देशांतर्गत बाजारातील किंमत चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर ही निर्यात शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.
हा करार केवळ मोठ्या उद्योगपतींसाठी नाही, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही थेट लाभदायक ठरेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आता नव्या बाजारपेठांचा प्रवेश मिळणार असून त्यातून अधिक दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने निर्यातीसाठी आवश्यक त्या सुविधा आणि पायाभूत सुविधा उभारल्या, तर शेतीमालाची जागतिक बाजारपेठेतील पोहोच आणखी सुलभ होईल.
हा करार भारताच्या कृषी क्षेत्रासाठी नवीन पर्व ठरणार आहे. कांदा, द्राक्षासह इतर फळे, भाज्या आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची निर्यात वाढण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अधिक उत्पन्न येण्याची शक्यता आहे.