E-NAM Scheme : शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला राष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग खुला; ई-नाम योजनेसाठी कायद्यात बदल…

E-NAM Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ई-नाम’ (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 
राज्यातील १३३ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या ई-नाम योजना राबविली जात आहे. या माध्यमातून शेतकरी व व्यापाऱ्यांना ऑनलाइन व्यवहाराची सुविधा मिळत असली, तरी बाजार ते बाजार आणि राज्य ते राज्य या पातळीवर थेट शेतमाल विक्री अद्याप शक्य झालेली नाही. यामागचं प्रमुख कारण म्हणजे ‘सिंगल युनिफाइड लायसन्स’ या महत्त्वपूर्ण तरतूदीचा अभाव. ही तरतूद लागू झाल्यास एकाच परव्यानाने व्यापारी अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार करू शकतील, जेणेकरून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळण्याची शक्यता वाढेल.

केंद्र सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या ‘मॉडेल ॲक्ट’च्या धर्तीवर राज्यात सुधारणेचे काम सुरू आहे. या सुधारित कायद्यानुसार ज्या बाजार समित्यांमध्ये इतर दोन किंवा अधिक राज्यांमधून शेतमाल येतो, अशा समित्यांना ‘राष्ट्रीय नामांकित बाजार समिती’ म्हणून घोषित करता येणार आहे. अशा बाजारतळांवर शासनाचे थेट नियंत्रण राहणार असल्याने निर्णय प्रक्रिया आणि व्यवहार अधिक गतिमान आणि पारदर्शक होतील.

या कायद्यात आणखी एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे बाजार समित्यांच्या सचिवांचे स्वतंत्र केडर तयार करून त्यांना शासन आणि समिती यामधील दुवा म्हणून कार्य करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. सचिवांचा पगार ‘देखरेख शुल्का’मधून दिला जाणार असून हे शुल्क थेट पणन विभागाकडे सुपूर्द होणार आहे. यामुळे प्रशासनिक जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट आणि जबाबदार राहतील.

या बदलांमुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी अधिक मोठ्या बाजारपेठा खुल्या होतील, स्थानिक दलालांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतमालाच्या किमती ठरवताना अधिक पारदर्शक व स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते आणि शेतकऱ्यांपर्यंत त्याचा किती प्रत्यक्ष फायदा पोहोचतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.